Skip to main content

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

अग्निदिव्य कादंबरी (अंतिम भाग)



*अग्निदिव्य*

*लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार*

*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔*

*___⚔🚩⚔📜🚩_______*

*बादशहाच्या खास खासगी महालात मोजके दरबारी मनसबदार खाली माना घालून उभे होते.* *महालाच्या फरशीवर दक्षिणेतून नुकतेच आलेले टपाल अस्ताव्यस्त विखरून पडले होते. वजीर* *जाफरखानालासुद्धा ते उचलून घेण्याची हिंमत होत नव्हती. वातावरणात मोठा तणाव भरून राहिला होता. खोजे आणि खिदमतगारांना महालातून काढून लावले गेले होते. मुद्दाम बहिरे करवले गेलेले हशम दारावर पहाऱ्याला उभे होते. पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघाप्रमाणे बादशहा येरझारा घालीत होता. त्याच्या हिरव्या डोळ्यांतून जणू आगीच्या ठिणग्या बरसत होत्या. मागे बांधलेल्या हातांमधल्या जपमाळेचे मणी झरझर सरकत होते. ज्वालामुखीचा एक उद्रेक होऊन गेला होता; पुढचा कोणत्याही क्षणी होणार होता. त्याची आग आपल्यावर कोसळू नये म्हणून प्रत्येकजण अल्लाला विनवीत होता. महालात भरून राहिलेल्या सन्नाट्यामध्ये मध्येच तडतडणाऱ्या चिरागदानातील वातीचा आवाजसुद्धा फार मोठा वाटत होता. येरझारा थांबवून बादशहा मसनदीवर बसला. साऱ्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. काही वेळ त्याने छतावर नजर लावली आणि ती हिरवी नजर थेट जाफरखानावर उतरली. हिंस्र श्वापदाच्या गुरगुरण्यासारखा आवाज उमटला–*


जाफरखान…
हुकूम आलमपन्हा.
उचल, उचल ते टपाल आणि या नामुरादांना वाचून दाखव नमकहराम मरगट्ट्यांनी काढलेले मुघलिया सलतनतीच्या अब्रूचे धिंडवडे. तू मोठी खात्री देत होतास त्या हरामखोर कुलीखानाच्या इमानपरस्तीची, गोडवे गात होतास त्याच्या प्रामाणिकपणाचे आणि कर्तबगारीचे. वाचून दाखव त्याचे पराक्रम, कसे त्याने माबदौलतांना हातोहात फसवले. कसे आपल्या साहेबी इमानाला काळे फासले.
लटपटत्या हातांनी जाफरखान कागद गोळा करू लागला. एक-दोन मनसबदारांनी पुढे होऊन कागद उचलण्यास मदत केली. मात्र जाफरखानाची टपाल वाचण्याची हिंमत होत नव्हती. कागद नीट लावण्याचा बहाणा करीत तो वेळ काढत राहिला. पुन्हा गुरगुरल्यासारखा आवाज उमटला–


माबदौलतांना पहिल्या दिवसापासूनच शक होता, हा हरामखोर कुठली उपरती झाली म्हणून शाही खिदमतीत दाखल झाला नाही तर ती त्या दगाबाज कोहस्तानी चूह्याची बेइमानी चाल होती. तो काफिर बुढ्ढा मिर्झाराजा त्याला सामील होता. आता शक यकीनमध्ये कायम झाला आहे. मात्र तो कोणता मकसद घेऊन आला होता, काही अंदाज लागत नाही. त्याने शाही दौलत वाळवीसारखी पोखरून काढली की काय? किंवा काफिर राजपुतांना त्याने शाही तख्ताच्या खिलाफ बगावत करण्यास फितवून ठेवले आहे का? या अल्ला, विचार करून करून डोके फुटायची वेळ आली आहे. तुम्ही सगळे अय्याशी करण्यात मग्न, मूठभर मियाँची हातभर दाढी अशा वायफळ गोष्टींपलीकडे तुमच्याकडून काय अपेक्षा करणार? एक-दोन नाही पुरती दहा वर्षे हा नामुराद सुअर आपला नापाक इरादा मनात घेऊन माबदौलतांना फसवीत राहिला. अल्लाची खैर तो अफगाणिस्तानात अडकला होता, जिथे दख्खनचा वारासुद्धा लागणे शक्य नव्हते. जर तो दिल्लीत असता तर…? मौका सापडताच हरामखोर आपल्या कमअस्सल आकाकडे पळून गेला. सुअर अशी नौटंकी करीत राहिला की माबदौलतांच्या आँखोंनी पण धोका खाल्ला.


पुन्हा शांतता पसरली. हिरवी नजर हातातल्या तसबीहवर स्थिर झाली. मणी थांबले. थोड्या वेळाने एक दीर्घ सुस्कारा सुटला, त्या श्वासात मिसळूनच शब्द उमटले–
लाहौलवलाकूवत. त्या हरामखोर काफिराने फक्त दौलतीशी किंवा माबदौलतांशी बेइमानी केली असे नाही, त्याने प्रत्यक्ष इस्लामची नाफर्मानी करून सर्वशक्तिमान अल्लाचा दगा करण्याची गुस्ताख कोशिश केली आहे. हा गुन्हा माफ करण्याचा हक प्रत्यक्ष पैगंबर सलल्लाह वसल्लम हजरतांनासुद्धा नाही. अशा पाप्यांना कुराणेपाक एकच सजा फरमावतो, तो जिथे आणि जसा सापडेल तिथे, लगेचच त्याला ठार करून, त्याची रूह त्याच्या जिस्मपासून वेगळी करून सैतानाच्या हवाली करायची आणि त्याला दोजखच्या आगीत रवाना करायचे. जाफरखान…
हुकूम…
उद्याच्या उद्या शाही फर्मानासोबत असे फतवे दख्खनमध्ये रवाना झाले पाहिजेत.
जो हुकूम जिल्हेसुभानी.
ऐलान कर, प्रत्येक नेक मोमिनचे फर्ज आहे, इस्लामची नाफर्मानी आणि अल्लातालाशी दगा करणाऱ्या पाप्याला कुराणेपाकने सांगितलेली सजा दिली पाहिजे. नापाक, बेइमान, इमानफरामोश काफिर कुलीखानाला शोधून काढा. सापडताक्षणी ठार मारा. त्यासाठी वाट्टेल ती किंमत द्यावी लागली तरी बेहत्तर. या नेक कामासाठी जे प्राण गमावतील ते शहीद म्हणून अल्लाच्या दरबारात बसतील. जन्नत उपभोगतील. जो त्या नापाक काफिराचे मुंडके माबदौलतांसमोर पेश करील त्याची सरफरोशी शाही दरबारातून तर केली जाईलच पण त्याशिवाय माबदौलतांच्या खासगीतून एक लाख अश्रफी माबदौलत स्वत:च्या मुबारक हातांनी देऊन नवाजतील.
उद्याच्या उद्या हुकमाची तामील होईल.


काही वेळ पुन्हा शांततेत गेला. मनसबदार चोरट्या नजरेने एकमेकांकडे पाहत होते. मात्र तोंडातून ब्र काढण्याची कोणाची छाती होत नव्हती. दानिशमंदखानाने काहीतरी बोलून बादशहाचा गुस्सा ठंडा करावा म्हणून जाफरखान त्याला खुणावत होता. वजिराला डावलणे त्याला शक्य नसले तरी धगधगत्या हुडव्यात हात घालण्याची त्याची शामत नव्हती. त्याने नजरेनेच असहायता व्यक्त करीत हाताने वजिराला थोडा धीर धरण्याची खूण केली. तेवढी चोरटी हालचालसुद्धा हिरव्या नजरेतून सुटली नाही.


दानिशमंद, ज्या क्षणी शिवाने त्या नमकहरामाला पनाह दिली त्या क्षणी माबदौलतांचा शक मजबूत झाला. मोठमोठ्या पंडितांसमोर जेव्हा त्याने जिरह केली आणि हिंदू धर्मात तशी पद्धत नसताना त्याला परत हिंदू करून घेतले, तेव्हा आता तर कोणताही शक शुबाह शिल्लकच राहत नाही. यकीनन त्या कोहस्तानी चूह्याने माबदौलत ज्याला मुघलिया तख्ताचा सर्वांत इमानी आणि वफादार शेर समजत होते त्या काफिर बुढ्ढ्या जयसिंहाला लाच देऊन फितूर केले आणि शाही छावणीत हरामखोर कुलीखानाची शिरकत करून घेतली. अफसोस! अफसोस!! या अल्ला, केवढे हे गलिच्छ राजकारण? त्या बुढ्ढ्याला नादान शिवासाठी दख्खन सुभेदारी मिळविता आली नाही म्हणून त्याने हा असा तिढा टाकावा? अफसोस! माबदौलतांची अक्कल काम करेनाशी झाली आहे. तो नामुराद कोहस्तानी चूहा इस्लामचा कट्टर दुश्मन आहे आणि तो अजून काय काय गुल खिलवणार आहे ते या अल्ला फक्त तू एकटाच जाणतोस. या सरजमीन-ए-हिंदला दार-उल-इस्लाममध्ये तबदील करण्यासाठी माबदौलत हर मुमकीन कोशिश जी जानसे करीत आहेत आणि हे परवरदिगार-ए-आलम या लाचार नाचीज बंद्याला तू अजून अजमावीत आहेस! सांग, दानिशमंद तू अल्लाचा प्यारा बंदा आहेस, या नाचीज बंद्याची अजून कोणती इम्तहान बाकी आहे सांग.




दानिशमंद काही बोलला नाही. आपल्या बोलण्यातून बादशहाचे समाधान होण्यापेक्षा गैरसमज होण्याचीच शक्यता अधिक हे मोगल रियासतीत हयात घालविलेल्या विद्वानाला बरोबर समजत होते. अशा प्रसंगी अक्कल पाजळून मुक्ताफळे उधळण्याचा नतीजा इतर मुत्सद्दी चांगलेच जाणून असल्याने ते तोंड उघडणे शक्यच नव्हते. महालात पुन्हा शांतता पसरली. हिरवी नजर प्रत्येकावरून फिरत होती. ज्याच्यावर ती काही काळ स्थिरावे त्याला नजर वर न उचलताच त्या नजरेची धग जाणवे आणि तळहात-पाय पार घामेजून जात.
रादअंदाज खान…
जी आलमपन्हा.
त्या नामुराद कुलीखानाचा जनाना इथेच शिकारपूरच्या त्याच्या हवेलीत शाही बंदोबस्तात माबदौलतांनी ठेवून घेतला आहे.
ही हजरत आलमपन्हांची मोठीच दूरअंदेशी झाली.
बिनकामाच्या मखलाशी करण्याची गरज नाही. शराबच्या नशेत तवायफांच्या गराड्यात पडून राहण्यापेक्षा याच्या निम्मी अकलमंदी जरी तुझ्यासारख्या शाही खिदमतगारांनी दाखवली तरी रुमशानपासून रामेश्वरपर्यंत मुघलिया सलतनतीच्या सरहद्दी पोहोचतील. इन्शाल्लाह. चापलूसी करून गुमराह करण्याची गुस्ताखी पुन्हा करशील तर खबरदार.
हुजुरे आला गुलाम गुस्ताखीची माफी चाहतो.
कुलीखानाच्या कबिल्यात आणि जनानखान्यात जेवढ्या जवान आणि काबील पोरी असतील त्या बाजारत वीक. आलेला पैसा माबदौलतांच्या नावाने फकीर, अपाहिज आणि जरूरतमंदांना खैरात म्हणून वाटून टाक.
जो हुकूम…


बाकी बायकांना जहर पाजून ठार कर. फातिहा किंवा कोणताही दुवा न पढता, त्या मुसलमान म्हणवत असल्या तरी, काफिर समजून एकाच खड्ड्यात त्यांना सुपुर्दे खाक करून टाक.
जी जिल्हेसुभानी.
तगड्या जवान पोरांना गुलाम म्हणून अरबस्तानात रवाना कर. त्यातून आलेला पैसा माबदौलतांच्या नावाने यतीमखान्यात देऊन टाक. कम उम्रचे जे लौंडे असतील त्यांना सरळ खोजे बनव आणि शाही जनानखान्यात दाखल करून घे.


हुकूम आलमपन्हा.
आणि त्या हरामखोर काफिराचा तितकाच हरामी काका. त्याला आग्र्याच्या भरचौकात हत्तीच्या पायी दे. बाकी पुरुषांना सरसहा कत्ल कर. नीट ध्यानात ठेव, त्याच्या वंशातला जनानखान्यातला किंवा परिवारातला एक जरी कोणी उरल्याचे पुढे कधी आढळले, तर तुझे डोके शिल्लक राहणार नाही आणि तुझ्या जनानखान्याचे हेच हाल होतील हे पक्के ध्यानात ठेव. उद्या फजरच्या नमाजानंतर तू रवाना झाल्याची खबर जाफरखानाकडून माबदौलतांना मिळाली पाहिजे. यासाठी तुला कोणताही लेखी हुकूम मिळणार नाही आणि तू पोहोचण्याआधी बातमी फुटली तर तुझी खैर नाही.


जी हुजुरेआला. आलमपन्हांच्या हुकमाची हरफ दर हरफ तामील होईल. इन्शाल्लाह.
हुकूम ऐकून त्या निर्ढावलेल्या मुघलांचीसुद्धा छाती दडपली. शब्दाशब्दांतून उमटणारी जरब ऐकून ते अधिकच धास्तावून गेले. ही वीज आपल्यावर न पडो अशी प्रत्येकजण अल्लाची करुणा भाकू लागला. या तणावपूर्ण शांततेत काही वेळ गेला आणि पुन्हा तोच जरबेचा कठोर स्वर त्यांच्या कानात शिरला–
माबदौलतांनी दख्खन सुभ्याला फर्मान पाठवले होते की, एकसुद्धा किला फते झाला नाही तरी बेहत्तर पण त्या नापाक सुअर कुलीखानाला शोधून काढून ठार करा. तर शाही पैशांवर गुलछर्रे उडवणाऱ्या अतिशहाण्या शाही अंमलदारांनी फर्मानातून सोईस्कर अर्थ काढला. आजपर्यंत एकही मोहीम त्यांनी कारगर तर केली नाहीच, पण त्या नमकहरामांनी बदजात कुलीखानाला पकडण्यासाठी काय केले? इकडची काडी तिकडे नाही. काय तर म्हणे शाही हुकूम हातात येण्याआधीच तो सुअर काफुर-अल् हुकूम किले रायगडसारख्या मेहफूज ठाण्यात पोहोचला. इतकेच नाही तर शिवाने कशी जिरह करून पंडितांना परास्त केले. कुलीखानाला पुन्हा हिंदू करून घेण्यासाठी कसा मोठा जलसा केला, दावत दिल्या, कशी खैरात वाटली, हे ते नादान मोठ्या कौतुकाने लिहितात. लानत है त्यांच्या इमानावर आणि इमानदारीवर. असे नापाक बेइमान अल्फाज यांच्या कलमेतून लिहिलेच कसे जातात? अफसोस! सख्त अफसोस!! या अल्ला, या तुझ्या गरीब असहाय एकट्या पडलेल्या बंद्यावर दया कर. तू सोपवलेले काम पूर्ण करण्यासाठी शक्ती दे. अरे परवरदिगार त्या कुलीखानासारखे माणिक तू का हिरावून घेतलेस? तो एकटा जरी सोबत असता आणि हे शाही दौलतीवर चरणारे सर्व अय्याश पलक झपकते गैबमध्ये गेले असते तरी तुझ्या या कमजोर बंद्याने तुझा संदेश हिंदोस्तांच्या हरएक कोन्यात नेण्याची हर मुमकिन कोशिश केली असती. या अल्ला मदद! या मौला मदद!


बोलता बोलता बादशहाच्या डोळ्यांत चक्क पाणी आले. प्रत्यक्ष वडील जन्नतनशीन झाल्याची खबर ऐकून अथवा ग्वाल्हेरच्या किल्ल्यात सर्वांत थोरल्या शहजाद्याचा इंतकाल झाल्याचे ऐकून जो पाषाणपुरुष पाझरला नाही त्याच्या डोळ्यांत अश्रू दाटले. गळा भरून आला. पण सांत्वनासाठी तोंड उघडून अंगाराने भरलेला पिटारा स्वत:वर ओढून घेण्याची कोणाची तयारी नव्हती. चार-दोन क्षणांतच बादशहा सावरला. पुन्हा भानावर आला.
इतिकदखान…
हुकूम मेरे आका.


माबदौलतांसाठी तू स्वत: दख्खनमध्ये जा. सोबत मोठा सरंजाम घेण्यात वेळ वाया दवडू नकोस. उशिरात उशीर पीरपर्यंत तू रवाना हो. सोबत बहादूरखान आणि दिलेरखानासाठी गुप्त फर्मान घेऊन जा, मीर अल्तमशला ताबडतोब जेरबंद करण्याचा दिलेरखानाला तोंडी हुकूम कळव. मीर अल्तमशला साखळदंडाने बांधून, खोगीर नसलेल्या उंटावर उलटे बसवून टाकोटाक रवाना कर. त्याच्या बंदोबस्तासाठी लागणारा खर्च त्याचाच सरंजाम विकून उभा कर. दिलेरखानाच्या निसबतीचे पाचशे पठाण सोबत घे आणि त्याला आग्र्याला घेऊन ये.
जो हुकूम मेरे आका. कैद्याला हुजूर दाखल केल्याशिवाय गुलाम तलवार म्यान करणार नाही. अल्ला कसम.


बहोत खूब घरच्याच खुराड्यातले कोंबडे पकडून आणण्यासाठी केवढी ही बहादुरी जाफरखान…
हुकूम जिल्हेसुभानी.
तो बेइमान आग्र्यात दाखल होताच तू स्वत: जातीनिशी जाऊन त्याला सिद्दी फुलादखानाच्या हवाली कर. त्याला हुकूम दे की, त्याने जो सलूक कमीना कुलीखान त्याच्या आदबखान्यात असताना त्याच्यासोबत केला तोच सलूक मीर अल्तमशखानासोबत कर. जर तीन महिन्यांनंतर तो हरामखोर जिंदा राहिलाच तर त्याला साखळदंडांनी बांधून दरबारात पेश कर.
हजरते आला हुकूम की तामील होगी.


गलथान बेइमान मीर अल्तमशखानाने, ज्या कुलीखानाला तब्बल दहा वर्षे माबदौलतांनी टाचेखाली दाबून कह्यात ठेवले होते, त्याला याने गाफील राहून फरारी व्हायला मदत केली. यापुढे जो कोणी गाफील राहील आणि शाही मकसद चूर करील तो हाच नतीजा पावेल.


रात्री बऱ्याच उशिरापर्यंत बादशहा आग पाखडीत राहिला. दरबारी खालमानेने ऐकत राहिले. मगरीने माणिक गिळले होते. आता ते तरी बिचारे काय करणार होते? मगरीच्या दाढांमध्ये हात घालण्याची हिंमत एकाही शाही सिपाहसालारमध्ये नव्हती, हे पुरते जाणून असलेला बादशहा चरफडण्याशिवाय काहीच करू शकत नव्हता. तो स्वत: राजधानी सोडून जाण्यास घाबरत होता. एकापाठोपाठ एक मंदिरे आणि पवित्र धर्मस्थळे उद्ध्वस्त केल्याने राजपूत दुखावले होते आणि नुकताच बैराग्यांनी दिल्लीला शह देऊन मोठा उधम केला होता.


शुद्धीकरणाच्या पंगती उठल्या आणि लगेचच गड रिकामा होण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी एकही हुद्देदार पाहुणा गडावर मुक्कामाला राहिला नव्हता. एवढेच नव्हे तर गडावर रेंगाळणारी रयतसुद्धा सूर्याजीच्या शिपायांनी काढून लावली. बिनकामाचा एकही माणूस गडावर उरला नाही. स्वराज्यातला प्रत्येक अधिकारी लगेचच आपापल्या जबाबदाऱ्यांवर रुजू झाला.


झाल्या प्रकाराने डिवचला गेलेला बादशहा कोणतेही घातक पाऊल उचलण्याची शक्यता होती. इतकेच नव्हे तर बहादूरखान आणि दिलेरखानासारखे कर्तबगार मोगल अधिकारी शाही हुकमाची वाट पाहत स्वस्थ बसून राहणे शक्य नव्हते. ते तातडीने कधीही जोरदार आक्रमक मोहिमा उघडणे शक्य होते. आदिलशाहीसुद्धा स्वराज्याच्या विरुद्ध हालचाल करणार असल्याची चिन्हे होती. शिवाय तशा मुस्तकीम खबरी सदरेवर दाखल होतच होत्या. सर्वांत धोकादायक शक्यता म्हणजे ‘इस्लाम खतरे में’ असल्याची आवई उठवत या दोन्ही सत्ता आपले ‘अहि-नकुल’ सख्य विसरून, हातमिळवणी करून एकत्र मोहीम सुरू करणे संभवत होते. आदिलशाहीत सध्या उत्तरी आणि त्यातही पठाणांचा दबदबा वाढला होता. अब्दुल करीम बहलोलखानासारख्या पठाणाने आपले मोठे वर्चस्व निर्माण केले होते. दिलेरखानासारखा मुत्सद्दी ही संधी सोडण्याची शक्यता फारच धूसर होती. त्याशिवाय त्याची आजवरची कर्तबगारी पाहता तो दिल्लीवरून हुकूम येण्याची वाट न पाहता हाच बागुलबुवा पुढे करून भागानगरच्या कुतुबशाहीलासुद्धा स्वराज्याविरुद्ध उभे करू शकत होता. दुर्दैवाने असे काही घडलेच तर आजवरचा इतिहास पाहता, या आयत्या चालून आलेल्या संधीचा गोवेकर आणि मुंबईकर या गोऱ्या सत्ता लाभ उठविण्यात मागे राहणार नव्हत्या. ते आणि जंजिऱ्याचा सिद्दी स्वराज्याच्या शत्रूंशी हातमिळवणी करणारच नाही असे सुतराम म्हणता येत नव्हते.


महाराजांसारख्या अष्टावधानी द्रष्ट्याच्या नजरेतून या सगळ्या शक्यता सुटणे शक्यच नव्हते; त्यामुळे त्यांनी प्रत्येक ठाणेदार, किल्लेदार, सरदारास सावधगिरीची सख्त सूचना रवाना केली होती. जागोजागीच्या सैन्य तुकड्यांना सज्जतेचे कडक हुकूम सुटले होते. पावसाळ्यासाठी घरी परतणाऱ्या शिलेदार-बारगिरांच्या रजा रद्द करून त्यांना छावणीतच ठेवून घेण्यात आले होते. खबरे आणि नजरबाजांवर विशेष कामगिरी सोपविली गेली होती.


शुद्धीकरणाचे क्रांतिकारी पाऊल उचलत असतानाच महाराजांची दृष्टी त्याचे परिणाम आणि प्रतिक्रियांचा वेध घेत होती. त्या अनुषंगाने निरनिराळ्या मोहिमांची आखणी होत होती. जेवणावळीच्या पंगती उठत असतानाच गडागडांवर तोफा, बंदुका ठासून जय्यत तयार होत होत्या. सैन्य तुकड्यांची हालचाल सुरू झाली होती. उत्सव समारंभाच्या धामधुमीतदेखील संरक्षणाच्या बंदोबस्तात अणुमात्र शिथिलता येऊ दिली गेली नव्हती.


चार दिवसांनंतर भरलेल्या दरबारात सर्व शास्त्रीमंडळींची यथास्थित संभावना केली गेली. सुपे भरभरून होन त्यांच्या पदरात घातले गेले. त्यांच्या विद्यार्थ्यांना यथायोग्य मानपान देऊन संतुष्ट करण्यात आले. याआधी इतर ब्राह्मणांना देकार आणि गोरगरिबांना दाने वाटली गेली होती.
दरबारात नेताजींचा मोठा सन्मान करण्यात आला. गनिमाच्या छावणीत आणि नंतरसुद्धा त्यांनी जे हाल आणि कष्ट सहन केले, त्याला तोंड देत अचल धैर्य राखले, प्रदीर्घ काळ शारीरिक-मानसिक यमयातनांचा सामना करीत राहून आपल्या ध्येयावर अढळ दृष्टी ठेवली याची महाराजांनी विशेष नावाजणी केली. मानाची वस्त्रे देऊन कंबरेला रत्नजडित मुठीची तलवार बांधली. पगडीत शिरपेच खोवला. चिपळूणच्या छावणीची देखरेख सोपविली; परंतु महाराजांनी त्यांना कोणतेही पद वा पदवी बहाल केली नाही.


दुसऱ्या दिवशी प्रात:काळी शास्त्रीमंडळी गडउतार झाली. टोळशास्त्रींनी आपले दोन विद्यार्थी नेताजींकडून कृच्छ आणि चांद्रायणे करवून घेण्यासाठी गडावर मागे ठेवले. आता त्यांच्याच देखरेखीखाली नेताजींचा खाना शिजणार होता.


नेताजींचा राबता खुला झाला. मात्र मोरोपंत आणि महाराज गडावर नसल्यास किल्लेदार सूर्याजी पिसाळ यांच्या परवानगीशिवाय त्यांना कोणी भेटण्याची इजाजत नव्हती. महाराजांनी अनेक सरदार आणि मुत्सद्द्यांना दिवसातून किमान एकदा तरी त्यांची भेट घ्यावी असे सांगून ठेवले होते. त्याच दिवशी दुपारच्या भोजनानंतर महाराज गड उतरले आणि पावसाळ्याच्या पूर्वी करायच्या छावण्यांच्या आणि गडकोटांच्या पाहणीसाठी ते निघून गेले.


महाराज परतले ते पाठीवर पाऊस घेऊनच. नेताजींची उरलेली प्रायश्चित्ते पूर्ण होत आल्याने टोळशास्त्रींच्या विद्यार्थ्यांनी महाराजांचा निरोप घेण्याची इच्छा प्रदर्शित केली. पण कोसळत्या पावसात घाट ओलांडून भरलेल्या नद्या-नाले पार करीत पैठणपर्यंत प्रवास करणे धोक्याचे असल्याने महाराजांनी चातुर्मास संपेपर्यंत त्यांना गडावर राहण्याची आज्ञा केली. त्याशिवाय त्यांनी निराजीरावजींना त्यांच्यायोग्य कामे जोडून देण्यास सांगून ठेवले.


एका संध्याकाळी नित्याप्रमाणे सदर बसली. सदरेवर मोजकीच मंडळी हजर होती. बाहेर आषाढ पूर्ण भराने कोसळत होता. पावसाळ्यानंतर गनीम काय करतो याची वाट पाहत न बसता नेहमीच्या रिवाजास अनुसरून काढायच्या नव्या मोहिमांची ढोबळ आखणी सुरू होती. अनेक वर्षांनंतर हा अनुभव पुन्हा घेणारे नेताजी चांगलेच उत्साहात होते. चर्चा जरा थट्टामस्करीच्या अंगानेच सुरू होती. मध्ये संधी मिळताच नेताजी म्हणाले–


महाराज आता हे बसून खाणे बस्स झाले. बसल्या जागी बुडाला मुळ्या फुटण्याची पाळी आलीय. बुद्धीला गंज आणि हातापायांवर शेवाळ धरायला लागलंय. काहीतरी कामगिरी सांगा.
नेताजीकाका कामगिऱ्या तर ढीगभर पडल्या आहेत. पण आता पाऊसकाळ उणावेपर्यंत तरी काही करणे शक्य नाही. त्याशिवाय आलमगिराची माणसे जंगली कुत्र्यांसारखी तुमचा माग काढीत आहेत. त्यांना अंगावर घेण्याची ही वेळ नव्हे. तेव्हा पूर्वी ठरल्याप्रमाणे तुम्हाला चिपळूणच्या छावणीची नेमणूक दिलेली आहेच तर तुम्ही सध्या काही दिवस चिपळुणास फौजेत मिसळून राहा. मग कामगिरी आहे आणि आपणही आहोतच.


पण गडावर अडकून राहून कसे निभावेल? काही चलनवलन हे हवेच.
छे! छे!! असे कसे? चला बरे झाले अनायासे विषय निघाला. आज आम्ही हुकूम काढणारच होतो, या संबंधाने. परवाची एकादशी झाली की, तुम्हाला चिपळूणच्या छावणीकडे निघायचे आहे. तोपर्यंत पाऊससुद्धा उसंत घेईल. हंबीरराव नेताजीकाकांना चिपळूण छावणीत सोडण्यासाठी तुम्ही जातीनिशी जावे. फौजेवर तुमचा वचक आहेच. शिवाय तुम्ही अनेक वर्षे त्या छावणीत होतात; त्यामुळे नव्या परिस्थितीत नेताजीकाकांचे छावणीत बस्तान बसवून देणे तुम्हास सोईस्कर होईल, पौर्णिमेपर्यंत छावणीत पोहोचा. वद्य प्रतिपदेला बाजीप्रभू देशपांडे यांचे पुण्यस्मरण आहे तो मोका साधून नेताजीकाकांच्या अग्निदिव्याचे महत्त्व सर्वांवर ठसविणे तुम्हास सहज शक्य होईल.


*जशी आज्ञा.*
*काही किरकोळ कामे उरकून महाराज सदरेवरून उठून गेले.*

महाराजांच्या अटकळीप्रमाणे खरोखरच एकादशीला दुपारनंतर पावसाने उघडीप दिली. द्वादशीला सकाळी गडाचे दरवाजे उघडताच हंबीररावांनी नेताजींना सोबत घेऊन गड सोडला. सोबत मोजकी शिबंदी होती. पाऊस थांबला असल्याने हवा सुंदर होती. खेडपर्यंतचा प्रवास अगदी झपाट्याने झाला. मात्र घाट चढून ते परशुरामाच्या जवळपास पोहोचले आणि पावसाने गाठले. पावसाचा जोर इतका भयंकर होता की, जणू आभाळच फाटले. भोवताली इतके दाट धुके पसरले की, तीन-चार हातांवरचे दिसणेही अशक्य झाले. भणाणता तुफानी वारा सुरू असूनसुद्धा धुके हटेना. कोंदटलेपणामुळे माणसांनाच नव्हे तर जनावरांनासुद्धा श्वास घेणे जड होऊ लागले. त्याउपर डोळे दिपविणारा विजांचा लखलखाट आणि कानाशी तोफ उडावी तसा ढगांचा गडगडाट. बिचकलेली घोडी पुढे सरेनात. जागच्या जागी खूर आपटीत शेपट्या फिस्कारीत उभी राहिली. त्यांना थोडे चुचकारून, थोपटून चालती केली आणि कसेबसे परशुरामाचे मंदिर गाठले. सोबतच्या मावळ्यांनी धावपळ करून मंदिराच्या ओवऱ्यांमध्ये कोरडी जागा पाहून खाशांच्या पथाऱ्या पसरल्या. देवळाच्या कारभाऱ्याने मंडळींसाठी गरमगरम तांदळाच्या भाकरी आणि फणसाच्या आठळ्या घालून केलेली कुळथाची उसळ पाठविली. चार घास खाऊन जरा मंडळी स्थिरावली. गप्पांच्या ओघात नेताजी म्हणाले–


हंबीरराव, आज कित्येक वर्षांनंतर हा आपल्या देशीचा पाऊस पाहण्याचे भाग्य लाभले. पावसाचा हा जोर, ही रौद्रता अफगाणिस्तानच्या पहाडी मुलखातसुद्धा अनुभवायला मिळत नाही. तिथे कहर घनदाट धुके आणि बर्फवृष्टीचा. आज या पावसाचा हा धडाका पाहून सिद्दी जौहरच्या वेढ्याच्या वेळेच्या पावसाची याद आली. अशाच भणाणत्या वाऱ्या-पावसात, घनघोर अंधारात महाराजांना पालखीत बसवून बाजी विशाळगडाकडे निघाले. खरोखरीच धन्य त्यांची.


जी सरकार, घाटात असताना माझ्या डोक्यातसुद्धा हाच विचार चालू होता. दिवसाउजेडी जनावरांच्या पाठींवर स्वार असताना आपण अगदी जेरीस येऊन ठेपलो. त्यांनी तो प्रवास कसा केला असेल, त्यांचे तेच जाणोत. सोबत खुद्द महाराज. त्यांच्या नखालासुद्धा धक्का लागू न देता त्यांना गनिमांच्या तावडीतून सोडवायचे याचा जीवघेणा ताण. त्याउपर गनिमांशी प्रहर अन् प्रहर दिलेली कडवी झुंज. आपल्या एका मावळ्याविरुद्ध गनिमाचे शंभर शिपाई. यांची दमछाक झालेली, ते ताज्या दमाचे. बाजींच्या आणि गुंजण मावळातल्या त्यांच्या सोबत्यांच्या क्षमतेची कल्पना करणे केवळ अशक्य. मनुष्यास आपली शक्ती, चिकाटी, श्रद्धा आणि समर्पणाच्या जोरावर काय करता येऊ शकते याचा घालून दिलेला वस्तुपाठच हा. महाराजांची प्रेरणा कोणाकोणाकडून काय काय दिव्य करवून घेईल सांगता येत नाही.


नेताजींनी चमकून हंबीररावांकडे पाहिले. ते निर्विकार भावाने पावसाच्या धारा निरखीत होते. त्यांना काही माहीत असावे असे त्यांच्या चर्येवरून तरी जाणवत नव्हते. नाहीतरी कोणता मराठा मनातले भाव चेहऱ्यावर दाखवितो म्हणा! माणसाची तोंडे पाहून आडाखे बांधणे मराठ्यांच्या बाबतीत तरी शक्य नाही, याचा आपल्याला विसर पडला की काय, अशी शंका त्यांच्या मनाला चाटून गेली.
दुसऱ्या दिवशीसुद्धा पाऊस बेफाम कोसळत राहिला; त्यामुळे मुक्काम हलविणे शक्य झाले नाही. पण महाराजांच्या आज्ञेप्रमाणे वद्य प्रतिपदेचा योग गाठणे आवश्यक होते; त्यामुळे तिसऱ्या दिवशी पहाटे पावसाची तमा न बाळगता त्यांनी चिपळूणकडे प्रस्थान ठेवले. घाट उतरला की, चिपळूण हाकेच्या अंतरावर. दुपारपर्यंत छावणी गाठावी असा त्यांचा बेत होता. वसिष्ठी दुथडी भरून वाहत होती. पाण्याची ओढ नजर ठरू देत नव्हती. मात्र तशा पुरात बेधडक घोडी घालून सांजावण्याच्या सुमारास त्यांनी छावणी गाठली.


आठवडाभर छावणीत राहून आणि नेताजींची नीट व्यवस्था लावून, पाऊस उघडलेला पाहून हंबीरराव परत निघाले. परतताना मात्र ते पन्हाळ्याला जाऊन तिथून कऱ्हे पठार, सासवड, पुणे, जुन्नर अशा निरनिराळ्या छावण्यांची पाहणी करीत रायगडी पोहोचणार होते. महाराजांची आज्ञाच मुळी तशी होती. कोसळत्या पावसात कोणी पाहणीसाठी येणार नाही असे समजून जर छावणी सुस्त किंवा गाफील असेल तर तीस वचक बसणे जरुरीचे होते. त्याशिवाय अशा वेळी माणसांच्या आणि जनावरांच्या दाणागोट्याची सोय कशी आहे हे पण नजरेखालून घालता येते.


हंबीरराव गडावर पोहोचले तो राखी पौर्णिमेचा दिवस होता. त्यांनी टाकोटाक महाराजांकडे भेटीची इजाजत पेश केली. महाराजांनी उलट सांगावा धाडला–
आपल्या ताईसाहेबांकडे राखी बांधण्यास याल तेव्हा भोजनोत्तर आमच्या खासगीच्या दिवाणखान्यात रुजू व्हावे. तेव्हा मोरोपंत, अनाजी, त्र्यंबक सोनदेव, प्रल्हादपंत, मानाजी काकडे, येसाजी शिळमकर, हिरोजी आदी मंडळींस हजर राखणे. बाळाजी आवजीस कलमदान ठेवून सिद्ध असो द्या. सर्वांच्या साक्षीनेच आम्ही सारा करीना ऐकू.


दुपारच्या भोजनानंतर महाराजांच्या खासगी दिवाणखान्याच्या महालात बैठक बसली.
बोला हंबीरराव, एका एका ठाण्याचा आणि आमच्या पन्हाळ्याचा हालहवाल बैजावार तपशिलाने सांगा.
हंबीररावांनी प्रत्येक ठाण्याचा इत्थंभूत झाडा दिला. महाराजांनी प्रत्येक बारीकसारीक गोष्टीचीसुद्धा तपशीलवार चर्चा केली. ज्या बाबींवर तातडीने हुकूम जारी करायचे होते त्यांचे तर्जुमे त्यांनी तिथल्या तिथे बाळाजींना सांगितले. हंबीरराव आणि इतर प्रधानांना योग्य त्या सूचना दिल्या. सरतेशेवटी त्यांनी विचारले–


सरनोबत, नेताजीकाकांची काय खबर? छावणीत हशमांचे आणि अंमलदारांचे बर्ताव कसे होते?
महाराज, आडमुठ्या ब्राह्मणांना दिलेल्या शिक्षेसह शुद्धीकरणाची अवघी खबर छावणीत आधीच पोहोचली होती. ज्याला दस्तूरखुद्द आपण कौल दिला, प्रसंगी कठोरपण पदरी घेऊन शुद्ध करून घेतले, त्यांच्याबद्दल कोण शक शुबा धरणार? त्यांचे फारच आदराने स्वागत झाले. त्यांना पाहून जुन्या मंडळींचे ऊर भरून आलेले जाणवत होते. त्या मंडळींनी त्यांच्या पायांवर घालून घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. आपली छावणी, आपली फौज, आपले मावळे सारे आपले पाहून नेताजी सरकार फारच उल्लसित झाले. त्यांनी अगत्याने छावणीची पाहणी केली. त्यांच्या स्मरणशक्तीला दाद दिली पाहिजे. मला महाराज आपलीच आठवण आली. कित्येकांना त्यांनी नावानिशी ओळख दिली. घरची चौकशी केली, तसेच शिपायांत मिसळणे, तशीच सलगी देणे थेट आपल्यासारखेच. सारे त्यांना योग्य त्या मानाने आणि मोठ्या जिव्हाळ्याने वागवीत आहेत. आठ दिवसांतच नेताजी सरकार छावणीत चांगलेच सरमिसळून गेले आहेत. फक्त त्यांना मोगली फौजेत जडलेल्या काही सवयी मोडायला थोडा वेळ लागेल एवढेच…
काही सवयी म्हणजे? काही गैर वा अवाजवी…?



छे! छे!! महाराज, तसे काही नाही. नेताजी सरकार एवढ्या साऱ्या दिव्यांतून जाऊन, एवढा ताण, कष्ट, हाल सोसूनसुद्धा कुठल्याही व्यसनाला बळी पडलेले नाहीत वा अय्याशीला चटावलेले नाहीत; ही शंभू महादेवाची कृपाच म्हणायची. पण छावणीतील रीतीरिवाजांच्या आपल्या वहिवाटी वेगळ्या, मोगली निराळ्या आणि महाराज इतक्या वर्षांच्या मानसिक ताणांच्या खुणा जाणवतात. स्वभाव थोडा चिडखोर अन् लहरी झाला आहे. भोगलेल्या कष्टांचा आणि हाल-अपेष्टांचा शरीरावर परिणाम झाला आहे. पूर्वीची तडफ, उमेद आणि काटकपणा आता राहिलेला नाही, हे प्रकर्षाने जाणवते. परशुरामापासून छावणीचे अंतर ते किती? पण पावसाच्या माऱ्यात अंतर काटताना त्यांची पुरती दमछाक झाली. मांडीखाली जनावर सांभाळण्याचे कसब पूर्वीचे राहिले नाही असे जाणवण्यास जागा आहे. नेहमी जुन्या जुन्या आठवणी काढून बोलत राहतात. मग अशा वेळी समोर कोण आहे याचेसुद्धा भान सुटते. न जाणो कधी पूर्वीची कुठली एखादी गुप्त मसलत त्यांच्या तोंडून बाहेर पडेल की काय याची धास्ती वाटू लागली आहे.


हे सारे असेच असेल आणि होईल याचा अंदेशा आम्हास आगाऊच आला होता. म्हणून इतके दिवस त्यांना आम्ही एकांतात ठेवून निरखीत होतो. जवळपास दहा वर्षे ते आलमगिराच्या छायेत वावरत आहेत, त्याला त्यांनी फार जवळून निरखले आहे. अनुभवले आहे, चांगलेच जाणले-जोखले आहे. काही कपट-कारस्थान करून दग्याने तो आपला जीव घेईल या भीतीने त्यांचे मन व्यापले असणे शक्य आहे. प्रत्यक्ष त्याच्या गोटात असताना, आदबखान्यातील छळाचा सामना करताना, त्याच्या पाताळयंत्री संशयाचा मुकाबला करताना ते मोठ्या दिलेरीने अन् बेदरकारपणे मृत्यूला आपल्या जुतीच्या ठोकरीवर वागवीत होते. पण आपल्या घरात, आपल्या माणसांत सुरक्षित वावरताना मात्र त्यांचे मन भयकंपित झाले आहे. हे असेच होत असते. या अनाठायी पण जीवघेण्या भीतीचा अनुभव आमच्यासुद्धा काळजाला स्पर्शून गेला आहे. आग्र्यावरून परतल्यावर आम्ही आजारी असताना, या भावनेशी आम्हीसुद्धा मोठी कडवी झुंज दिली आहे. त्या वख्ती आईसाहेब होत्या, त्यांनी, तुमच्या ताईसाहेबांनी आणि आमच्या अन्य महालांनी, तुम्हासारख्या सवंगड्यांनी आणि मनी कायम धगधगत असलेल्या ध्येयनिष्ठेने आम्हास फार लवकर सावरले. आम्ही आलमगिराच्या शिकंजात तसे फारच थोडा काळ होतो. त्याने आमची कोंडी केली. मनस्ताप दिला. मरणाचे भय शिरावर अष्टौप्रहर टांगत ठेवले. पण नेताजीकाकांनी प्रदीर्घ काळ त्याच्या दाढेखाली काढला. अकल्पनीय मानसिक आणि शारीरिक छळाचा मुकाबला केला आहे. एकाकीपणे आधाराशिवाय केवळ अनिश्चिततेचीच त्यांच्यासमोर निश्चिती होती, सतत अकरा वर्षे. आम्हास मिर्झाराजांसारख्या मातब्बर राजपुताच्या वचनाचा काडीइतका का होईना आधार होता. रामसिंहाचा आसरा होता. प्रेमाची, विश्वासाची आपली माणसे भोवती वावरत होती. करुणा भाकण्यास दैवते होती. त्यांच्या बाबतीत साराच उन्हाळा. ते सलामत परत आले. पण त्यांचा कबिला? त्याचा घोर त्यांच्या जिवाला आहेच. आलमगीर त्यांचा काय नतीजा करणार हे ते पुरते उमगून असणारच. कितीही दडवावे म्हटले तरी त्या भयानक खबरा लपून राहणे अशक्य. या कारणेच आम्ही त्यांस शिरपेच दिला, पण शिक्का कट्यार सोपवली नाही. स्वराज्याच्या ऐन गाभ्यात फौजेच्या गराड्यात ठेवले आहे. थोड्याच दिवसांत कदाचित ते मोठे आजारपणसुद्धा काढतील. त्याचीसुद्धा पुरती तजवीज राखा. त्यांना फार फार जपावे लागेल. त्यांचे मन सांभाळावे लागेल. उभारी वाटेल असे सतत त्यांच्याभोवती काहीना काही राखावे लागेल.
विषण्ण शांतता पसरली, कोणालाच काही बोलणे सुचेना. शांततेचा भंग केला त्र्यंबक सोनदेवांनी.
महाराज…


महाराजांची शून्यात गेलेली नजर त्यांच्यावर स्थिरावली.
महाराज, एखादी बरीशी मुलगी पाहून त्यांचे लग्न लावून द्यावे असे वाटते.
पंत, मसलत तर बरोबर आहे, पण ती दहा-अकरा वर्षांची पोर त्यांना काय सावरणार? उलटे तीच बिचारी घाबरून जायची आणि एक वेगळाच अनर्थ उभा ठाकायचा. पंत तुम्ही, अनाजी तुम्ही, मोरोपंत आणि प्रल्हाद निराजी तुम्ही, जातीनिशी लक्ष ठेवून त्यांची खबर घेत असणे. हंबीरराव, येसाजी, सर्जेराव अन् सूर्याजी तुम्ही सारे जमेल तसे त्यांना भेटत राहणे. त्यांचे मन मोकळे होईल हे पाहणे. मनाचा निचरा करण्यास चांगला खांदा मिळाला तर गोष्टी बऱ्याच सोप्या होतात. मिरजेहून व्यंकटेश भट वैद्यांना त्यांच्या दिमतीस रवाना करणे.



महाराज, नेताजीरावांची जुनी विश्वासू चाकरमंडळी आणि पूर्वीची तैनातीतली माणसे सोबत कोणी भरवशाचा मोहरा देऊन त्यांच्यासोबत ठेवली तर त्यांना सावरण्यास बळ येईल. आत्ता स्वामींनी जे सविस्तर विशद केले त्याची त्यांस पुरती जाण देऊन ठेवल्यास मंडळी साक्षेपाने राहतील.
महाराज, अण्णाजी पंतांच्या म्हणण्यात तथ्य आहे. माझेही मत त्यांच्यासारखेच आहे. जणू माझेच विचार त्यांच्या मुखातून बाहेर पडले.


व्वा मोरोपंत! आत्ता बोलताना आमच्या मनातसुद्धा हेच नेमके घुमत होते. बघा कशी आपली मने तादात्म्य पावली आहेत. म्हणूनच तर केवळ भुवईच्या संकेतावर अवघडातले अवघड मनसुबे चुटकीसरशी पार पडतात. हंबीरराव, नेताजीकाकांची जुनी माणसे, सुभानराव, गोदाजी आणि खाशाबा असतील तेथून शोधून काढा. त्याचप्रमाणे मोगली छावणीतून त्यांच्या सोबतीने परत आलेले सिद्दी आफताब आणि नर्दुल्लाखान पठाण ही मंडळी त्यांच्या दिमतीला रवाना करा. त्या दोघांनासुद्धा दगा होण्याचा अंदेशा आहे. त्यायोगे त्यांचीपण चांगली हिफाजत होईल. जबाबदार असामी म्हणून हिरोजी फर्जंदास त्यांच्या निसबतीत जोडा. त्यास आमच्याकडे धाडून द्या म्हणजे त्यास करीनेवार समजवता येईल.
जी महाराज.


दर आठ-दहा दिवसांनी आम्हास त्यांचे वर्तमान मिळत राहील याची मोरोपंत तुम्ही जातीने काळजी घ्या.
जी. आज्ञा.
इतका वेळ ही चर्चा मुकाट बसून ऐकणारा फिरंगोजी नरसाळा आपल्या पांढऱ्याधोप गालमिश्या पालथ्या मुठीने सावरीत म्हणाला–
म्हाराज, अबय आसंल तर योक शंका इचारावी म्हन्तो. आता इतकी तालेवार हायती. उडत्या डोक्याची बामणं हायती पर आलं टकुऱ्यात, ते इचारू का?
बोला बोला. बेशक विचारा. तुमच्या शंका मोठ्या नमुनेदार असतात. कधी कधी अवघड बाबी सहजी करून टाकतात. विचारा.
न्हाई म्हन्जी आता ज्ये काय बोलनं जालं आज जे काय तुमी बोललासा, त्ये म्हन्जे नेताजी सरकार काय आता पुन्यांदा सरनोबत हुयाचे न्हाई किंवा ग्येलाबाजार तसलं काय थोरलं बांक्या जिम्मेदारीचा हुद्दा सांबाळन्याजोगं ऱ्हायले न्हाईत. म्हन्जे चार-दोन वरसं तरी काय तशी उमेद ऱ्हायली न्हाई. मंग म्हाराज, त्यांना परत आनन्याचा आन् सुद्द करून घेन्याचा येवडा जंगी खटाटोप क्येला तो समदा पान्यातच ग्येला म्हनायचा.


आम्ही म्हणालो ना, फिरंगोजीच्या शंका म्हणजे नमुनेदार असणार म्हणून. आता असे बघा फिरंगोजी, नेताजीकाकांना परत आणले म्हणजे आपण आपले हरवलेले माणूस परत मिळवले नाही का? अहो, गोठ्यातली एक कालवड वेळेवर परत आली नाही तरी जीव खालवरी होतो आपला. मग एवढा मोठा तालेवार तलवारीचा रुस्तम मोहरा काय वाऱ्यावर सोडून द्यायचा? दुसरे म्हणजे त्यांच्या निमित्ताने आम्ही हा खटाटोप केला तो गनिमाच्या डोळ्यांत अंजन घालण्यासाठी. काय. बरोबर की नाही?


जी अक्षी बरुबर हाय म्हाराज. तिच्या मायला तिच्या, आमचं टकुरं कायम फकस्त हानामारीचाच इचार करतंया. असलं नाजूक इचार आन गुंतावळ्याची हलक्या हाताची सोडवनुक कंदी ध्यानास येतच न्हाई. ह्ये समदी मंडळी हायती म्हनून ठीक हाय. न्हायतर आमचं काय खरं नव्हतं बगा म्हाराज.
हसण्याचा एकच खकाणा उडाला आणि मंडळींच्या मनावर आलेली विषादाची, उदासीची मरगळ आपसूकच दूर झाली.


नेताजी चिपळूणच्या छावणीत स्थिरावले. रुळले. महाराजांच्या हुकमाप्रमाणे विशाळगडापासून ते थेट फोंड्यापर्यंत गडकोटांना भेटी देऊन तिथल्या शिबंदीची, बंदोबस्ताची पाहणी करू लागले. निमित्तानिमित्ताने मानकरी त्यांना भेटून जात. कधी हास्यविनोद होई, तर कधी जुन्या आठवणी उजळल्या जात. कधी महाराजांच्या वतीने कोणी मुत्सद्दी येऊन कोणा समस्येवर त्यांचा मनसुबा घेऊन जाई. असे वाटू लागले की, आता लवकरच नेताजी मूळ पदावर येणार.
एक दिवस भल्या सकाळी आन्हिके आटोपून नेताजी छावणीतल्या शिवमंदिरात देवदर्शनास निघाले. तेवढ्यात प्रतापगडावरून रातोरात निघालेला हरकारा चौखूर घाड दाडवात सामारा आला. झप घत पायउतार हात त्यान कसाबसा मजरा घातला. फुलल्या श्वासातच त्याने निरोप सांगितला–
सरकार, घात जाला.


नेताजी चमकले. मंदिराकडे न जाता तसेच माघारी फिरून छावणीच्या सदरेवर पोहोचले. चालतानाच भराभरा हुकूम देऊन त्यांनी महत्त्वाच्या मोहऱ्यांना सदरेवर बोलावले. रामप्रहरीच सदर बसली. सदरेबाहेर मावळ्यांची मोठी गर्दी जमली. हरकाऱ्याचा श्वास अजून निवत नव्हता. भरल्या श्वासातच त्याने सांगावा तोंडी सांगितला.


सरकार, रायगडास्न पंतपरधान मोरोपंत सरकारांची तातडीची थैली हाय. सरकार, घात जाला. कंदी व्हनार न्हाय त्ये जालं. परत्यक्ष युवराज संबाजीराज माहुलीच्या घाटावरून निसटलं आन गनिमाला, मोगली दख्खन सालार पटान दिलेरखानाला जाऊन मिळालं. संगत त्येंचा धाकला म्हाल दुर्गाबाई रानीसरकार हायती. म्हाराजांच्या हुकमापरमानं मोरोपंत सरकारांनी दर एक ठाना-गडकोट आन छावनीस अशीच थैली धाडलिया. सांच्याला गडावर थैली पावली आन किल्लेदारानं रातोरात थैली छावणीत दौडवली तो आत्ता पावता जालो. ह्ये थैली सोता नेताजी सरकारांच्या हाती द्येयाचा हुकूम हाय.
अरे माझ्या कर्मा, हे काय करून बसले बाळराजे?


असे बोलत नेताजी ताडकन उभे राहिले. हरकाऱ्याने हाती दिलेली थैली त्यांना उघडवेना इतके त्यांचे हात थराथरा कापू लागले. अखेर त्यांनी थैली चिटणिसाहाती सोपविली. थरथरत्या हाताने त्याने हुकमाचा कागद बाहेर काढला आणि कापऱ्या आवाजात वाचायला सुरुवात केली. हरकाऱ्याने तोंडी सांगितलेले वर्तमान खलित्यात होते. शिवाय सावधगिरी ठेवण्याचे, युवराजांचे नाव घेऊन कोणी फंद माजविण्याची कोशिश करताना सापडल्यास त्याला थेट कडेलोट वा तोफेच्या तोंडी देऊन ठार करण्याचा हुकूम अतिशय कडक शब्दांत कळविण्यात आला होता. उभ्या उभ्या खलिता ऐकणारे नेताजी धाडकन खाली कोसळले. त्यांना उचलून मसनदीवरच आडवे झोपविले. मोठ्या प्रयत्नांनी ते शुद्धीवर आले. काही वेळ तसेच सुन्न बसून राहिल्यावर ते पुरते भानावर आले. भराभरा हुकूम सोडून छावणीचे पहारे चौक्या गस्त कडक करविली. पुढच्या हुकमापर्यंत कोणालाही छावणीबाहेर पडण्याची मनाई करण्यात आली. दोन मावळ्यांच्या खांद्यांवर हात ठेवून नेताजी कसेबसे कमऱ्यात पोहोचले.


तासा-दोन तासांत नेताजी सावरले. त्यांनी चिटणिसाला बोलावून घेतले.
चिटणीस तातडीने महाराजांसाठी खलिता लिहा आणि घटकाभरात आमच्या दस्तुरीसाठी पेश करा. खलिता टाकोटाक रवाना झाला पाहिजे. त्यात आमची विनंती लिहा की, युवराज शेवटी आपलेच लेकरू. काय कारणे दुखावले आणि भलते करून बसले. सर्वेश्वर जाणे. सर्व अपराध पोटात घाला आणि हर प्रयत्न करून होईल त्या तातडीने लेकरास परत आणवा. आम्ही गनिमाहाती काय नतीजा पावलो ते युवराजांस तपशिले सांगावा. बादशहा मोठा दगाबाज, काफिरास दिलेले वचन मोडणे पाप नाही असे मानणारा. दिलेर त्याचाच खादिम. आपल्यावरील आणि आमच्यावरील राग लेकरावर काढल्याशिवाय राहायचा नाही. लेकरू हकनाक हातचे जायचे.


तिसऱ्या प्रहरी त्यांनी छावणीची सदर भरविली.
मंडळी, नेमके काय घडले अन् युवराज हे करून बसले कोणालाच काही माहीत नाही. पण त्यांचे नाव घेऊन कोणी फितवा करू पाहील तर मुलाहिजा ठेवला जाणार नाही. प्रसंग पडलाच तर सरळ मुंडके मारले जाईल. आपली निष्ठा स्वराज्याशी, सांब सदाशिवाच्या आणि आई भवानीच्या पायांशी. आजपासून दस्तावेजाबिगर कोणी छावणी सोडून बाहेर जाणार नाही की कोणास आत घेतले जाणार नाही. येणारा प्रत्येक हरकारा, कागदाचा प्रत्येक चिटोरा प्रथम आमच्याकडेच आला पाहिजे. चिटणीस प्रत्येक गडावर कागद पाठवून खबरदारीचे आमच्या तर्फेचे हुकूम जारी करा. किल्लेदारांस सांगावा धाडा, आम्ही कुठल्याही क्षणी गडावर येऊन ठेपू. ढिलाईचा नतीजा बरा होणार नाही.
दिवेलागणीला हिरोजी मुजऱ्यासाठी आला. नेताजींनी त्यास थांबवून घेतले. थोडे इकडचे तिकडचे किरकोळ बोलणे झाल्यानंतर अस्वस्थ हिरोजीने स्वत:च विषय काढला. हिरोजी मोठ्या तळमळीत बोलला–


सरकार, लई वंगाळ जालं बगा. परतेक्ष ल्येक बापाच्या, स्वराज्याच्या, धरमाच्या दुश्मनाकडं जावा. काय गुदरली आसंल म्हाराजांच्या काळजावं, ह्ये उद्याचं म्हाराज छत्रपती व्हायाचं; त्येंना काय अवदसा आटवली. कुनी हरामजाद्यानं फितवलं आसंल बाळराजास्नी काय उमगंना. हाती गावला तर आईची आन; पयलं मुंडकं तोडीन मंग नाव पुसीन.


हिरोजीचा शोक-संताप उरात मावत नव्हता. त्याला जशी महाराजांची चिंता वाटत होती तशीच युवराजांची पण वाटत होती. मध्येच त्यांचा संताप येत होता तर मध्येच कीव, कणव येऊन डोळे भरून येत होते. स्वत:चे मन आवरून नेताजींनाच त्यास सावरावे लागले. मग थोड्या वेळाने स्वत:शी बोलावे तसे ते बोलू लागले.


आम्हाला आठवतात बाळराजे, ते जन्मले तेव्हाचे; आम्हीच होतो किल्लेदार पुरंदराचे. आम्हीच दिला हुकूम तोफांना बत्ती देण्याचा. मिर्झाराजांच्या छावणीत ओलीस म्हणून राहिले तेव्हा फक्त नऊ वर्षांचेच होते. त्यांच्या हिफाजतीचा जिम्मा महाराजांनी आमच्यावर टाकला होता. रात्री जागवल्या त्यांच्या उशाशी हत्यार तयार ठेवून बसून राहण्यात! सुरुवातीस थोडे घाबरले होते. पण मग त्यांनी मराठी बाणेदारपणाने मिर्झाराजांस जिंकून घेतले. याच दिलेरचे गर्विष्ठ तोंड त्यांनी बंद केले होते. राजे तीन वेळा बादशहाच्या हातावर तुरी देऊन सुटले. आग्र्यातून, मग मथुरेतून आणि शेवटी औरंगाबादेतून. आता तो काही बाळराजांना गमावणार नाही. महाराजांनी तातडी करून त्यांना परत आणलेच पाहिजे.


काही महिने उलटले आणि थैलीस्वार दौडत आला. ‘युवराज परत आले’ असे ओरडतच तो छावणीत दाखल झाला. नेताजींना वर्दी पोहोचली तेव्हा ते खासगी कमऱ्यात पोशाख करीत होते. त्यांनी हरकाऱ्यास थेट तेथेच बोलावून घेतले. त्याने सुपुर्द केलेली थैली त्यांनी मोठ्या अधीरतेने उघडली पण त्यांना वाचणे सुधरेना. अखेर त्यांनी चिटणिसांकडूनच वाचून घेतली. एकीकडे त्यांना हसू येत होते, तर एकीकडे त्यांचे अंग हुंदक्यांनी गदगदत होते. छावणीत भांडी वाजविण्याचा आणि साखर वाटण्याचा हुकूम झाला. ढोल-ताशे, तर्फे-हलगी, शिंगे-तुताऱ्यांनी छावणी दणाणून गेली. मध्येच ठासणींचे बार फुटत होते. पालथ्या मुठीने डोळे कोरडे करीत, भरल्या आवाजात ते हिरोजीला म्हणाले–


हिरोजी, बाबा देव पावला. लेकरू घरी सुखरूप परत आले. बादशहाने जे आमचे हाल केले तेच त्यांचे केले असते यात काही शक नाही. कोवळे पोर नाही टिकते त्याच्यासमोर. देवा खंडेराया, माझी उमर लागू दे रे देवा युवराजांना.
बराच वेळ मग ते आपण फुलादखानाच्या आदबखान्यात काढलेल्या दिवसांच्या आठवणी सांगत राहिले.
-
युवराज परत आले. पन्हाळ्यावर महाराज त्यांना भेटले. त्यांना कौल देऊन कोल्हापूर आणि कोकणचा सुभा त्यांच्यावर सोपवून महाराज रायगडी गेले पण त्यांनी युवराजांस रायगडी सोबत नेले नाही. येसूबाईंना माहेरी शृंगारपुरी राहण्याचाच हुकूम झाला. अशा बातम्या छावणीत येत होत्या. पण त्या बातम्यांचा धड अर्थ नेताजींना लागत नव्हता.


थोड्या दिवसांनी महाराज रायगडावर आजारी झाल्याची बातमी छावणीत पोहोचली. मागोमाग छावणीच्या खबरगिरांकडून खबरा आल्या की, रायगडाचा राबता बंद झाला आहे. महाराणी सोयराबाईंनी अनाजी दत्तोंना हाताशी धरून गडात चौक्या पहारे बसविले. मोरोपंत पेशवे आणि सरनोबत हंबीरराव मोहित्यांना सोयराबाईंनी मोहिमांच्या निमित्ताने दूर ठेवले होते. संभाजीराजांस पन्हाळा सोडण्यास मनाई झाली होती. छावणीवर विषादाची गडद छाया पसरली.


नेताजींनी महाराजांच्या दर्शनाची परवानगी घेण्यासाठी माणूस पाठविला पण त्याला पाचाडातूनच परतावे लागले. घडणाऱ्या घटनांचा नेताजींना अर्थच लागेना. गेल्या कित्येक महिन्यांत छावणीतील शिपाई बदलले गेले नव्हते कारण मोहिमा थंडावल्या होत्या. कोणा जबाबदाराची गाठभेट घडली नव्हती. हुकूम नसल्याने त्यांना पन्हाळ्यास जाऊन युवराजांची भेट घेणे शक्य होईना.


आणि एक दिवस विजेच्या लोळाप्रमाणे बातमी कोसळली, छत्रपती महाराजांना देवाज्ञा झाल्याची! आश्चर्य म्हणजे युवराज पोहोचण्याची वाट न बघता त्यांना भडाग्नी देऊन अग्निदाह उरकला गेला. प्रधानमंडळांच्या घरांवर चौक्या पहारे बसले. छावणीत सोयराबाईंच्या माहेरची म्हणून त्यांच्या विश्वासाची जी मंडळी होती त्यांना नेताजींवर नजर ठेवण्याची कामगिरी आली. रामराजांचे मंचकारोहण करवून रायगडावरून फौजा युवराजांना जेरबंद करण्यासाठी पन्हाळ्याच्या दिशेने निघाल्या पण सरनोबत हंबीररावांनी हालचाली करून सोयराबाईंच्या कारस्थानांना पायबंद घातला. युवराज रायगडी आले. महाराजांच्या निर्वाणानंतर नेताजींना काही न सांगतासवरता अचानक पन्हाळ्यास निघून गेलेला हिरोजी युवराजांच्या हाती जेर झाल्याची बातमी आली. नेताजी फारच कष्टी झाले. हिरोजीच्या गैरहजेरीत आता माल्होजी घोरपड्यांचा मुलगा संताजी नेताजींची मोठ्या आस्थेने देखभाल करीत होता.
-
महाराजांचा काळ झाला आणि नेताजींनी पुन्हा कधी उभारी धरलीच नाही. दिवस-दिवस विमनस्कपणे शून्यात बघत बसून राहत, तर कधीकधी रात्री-अपरात्री दचकून जागे होत आणि बायका-पोरांची नावे घेऊन हाका मारीत. दिसायला दणकट असले तरी घोड्यावरची मांड आणि हत्याराची पकड ढिली झाली होती. महाराज असताना चिपळूणच्या छावणीतूनच त्यांनी चार-दोन बारीकसारीक मोहिमा केल्या होत्या, पण ना त्यात पूर्वीची धडाडी होती ना पूर्वीचा जोश. छावणीतील सारे त्यांना खूप जपत, सांभाळत; पण त्यांच्या पश्चात हळहळत.
हळूहळू नेताजींचा एकलकोंडेपणा वाढत गेला. आता त्यांनी आफताबखानाशिवाय आपले सगळे हुजरे आणि सेवक दूर सारले. आफताबखान सावलीसारखा अष्टौप्रहर त्यांच्या सोबत असे. कधी लहर लागली तर संताजीला समोर बसवून जुन्या आठवणी काढत, घटकान् घटका बोलत बसत. आदबखान्यातील, अफगाणिस्तानातील किंवा बादशहाच्या लहरी धर्मांधतेचे किस्से सांगत बसत. आपण आतून खचत चालल्याचे आणि आपली ताकद घटत चालल्याचे त्यांना जाणवू लागले होते. ती खंत ते संताजीकडे आणि आफताबकडे बोलून दाखवीत.


एक दिवस दुपारच्या थाळ्यानंतर आचवत असताना त्यांच्या हातातून लोटा निसटला. त्यांना आपला उजवा हातच हलविता येईना. हाती तोंडपुसणी घेऊन जवळच उभ्या असलेल्या आफताबखानाच्या ध्यानी येण्यापूर्वीच ते धाडकन खाली कोसळले. बघताबघता त्यांचे उजवे अंग लुळे पडले.
रायगडावर संभाजीराजांकडे तातडीने खबर रवाना झाली. त्यांनी आपला स्वत:चा वैद्य त्यांच्या उपचारास धाडला. कबुतराच्या रक्ताने, सांड्याच्या तेलाने, घोरपडीच्या तेलाने, वाघाच्या चरबीने, कशाकशाने त्यांना मालीश केले याची गणती नाही. पण त्यांना उतार पडेना. एके काळी ज्याच्या नुसत्या नावाने गनिमांना थरकाप सुटे असा दिलेर मोहरा लोळागोळा होऊन खाटेवर पडलेला बघवेनासा झाला.
असेच जवळपास चार महिने लोटले. आता ताप भरू लागला. तापाच्या ग्लानीत त्यांना भ्रम होऊ लागला. अशा अवस्थेत असताना ते महाराजांना भेटायला नेण्याचा हट्ट धरू लागले. समोर दिसेल त्यांच्याकडे त्यांचा एकच धोशा असे–


मला महाराजांकडे जायचे आहे. बहिर्जीला बोलवा. तो मला महाराजांच्या पायाशी घेऊन जाईल. तुम्ही सारे कुचकामी आहात. मला महाराजांपासून दूर ठेवता. कसेही करा, मला महाराजांना भेटवा. मला त्यांची माफी मागायची आहे. त्यांनी सोपविलेली कामगिरी मी त्यांच्या मनाजोगती करू शकलो नाही. उलट त्यांना अतोनात त्रासच दिला. माझ्यासारख्या करंट्यासाठी स्वराज्याच्या सेवेतील नामांकित माणसे नाहक खर्ची पडली पण हाती काही लागले नाही. मी पापी आहे. त्यांची बायका-पोरे माझ्यामुळे उघडी पडली. मी त्यांचा, महाराजांचा, स्वराज्याचा अपराधी आहे. मला त्यांची क्षमा मागू द्या.
असेच दोन महिने उलटले. हळूहळू त्यांची वाचा क्षीण झाली. नजर हरवली. अगदी तोंडाशी कान नेला तर जाणवे, त्यांचे ओठ महाराजांच्या नावाचा जप करीत आहेत. एके दिवशी रात्री तब्येत फारच बिघडली. श्वास धड चालेना. मध्येच आचके येत. घशातून विचित्र आवाज निघत. संताजीने माणूस पाठवून राजवैद्यांना बोलावून घेतले. वैद्यबुवांची चर्या गंभीर झाली.
पंत, कशी हाय सरकारांची प्रकृती?


कठीण आहे. आजची रात्र निभावली तरी पुरे.
अरे द्येवा, आता म्या युवराजास्नी काय तोंड दावू? त्यांनी नेताजी सरकारांना माज्यावर सोपवला, पर म्या त्यास्नी न्हाय राकू शकलो. कुटं फेडू ह्ये पाप?
संताजी, सबूर. तू तुझे कर्तव्य चोख पार पाडलेस. दैवगतीसमोर कोणाचा काय इलाज चालणार? प्रत्येकाची वेळ ठरलेली असते. प्रत्यक्ष ब्रह्मदेवसुद्धा त्यात ढवळाढवळ करू शकत नाही. शोक आवर.
पंत, जायाचं तर हर येकाला हाये. पर नेताजी सरकारांसारका तिखट हत्याराचा आन अफाट अकलेचा रणनवरा ह्यो असा खाटेवर पडून झिजतझिजत जावा यापरीस दुसरे वंगाळ काय न्हाई. येकाद्या निकराच्या झुंजात परतापरावांवानी पडते तर डोळ्यांतल्या पान्यानं शेले जरूर भिजते. पर मोटा अभिमान वाटता.
संताजी, हेच प्राक्तन. यालाच विद्वान दैवगती म्हणतात. अस्तु. मी हेमगर्भाची मात्रा चाटवली आहे. कितपत काम करेल हरी जाणे. पण सावध असा. कदाचित शुद्धीवर यायचे. काही महत्त्वाचे सांगायचे.
जी. पंत, मी हतंच बसलेला हाय. संगतीला ह्यो आफताबखान बी हायेच की. आमी पुरते सावध ऱ्हाऊ.
ठीक आहे. आता येतो आम्ही. काही विपरीत जाणवले तर पुन्हा बोलावण्यास अनमान करू नका, मग रात्र कितीही चढलेली असो.


वैद्यबुवांच्या मते धीर देऊन पण प्रत्यक्षात घोर लावून वैद्यबुवा निघून गेले. पायथ्याशी बसून आफताबखान काशाच्या वाटीने तळव्यांना तूप घासत राहिला. संताजी उशाशी बसून नेताजींचा क्षीण, म्लान चेहरा एकटक निरखीत राहिला. दोघे एकमेकांशी शब्द बोलत नव्हते. आफताबखानाच्या मनात अनेक आठवणी कल्लोळत होत्या. त्याच्या डोळ्यांसमोर त्याने पाहिलेली अनेक रूपे उमटत होती. अधूनमधून अंगच्या बाहीने तो पाझरणारे डोळे पुसत होता. कोणासाठी न थांबणारा काळ सुसाट धावत होता; मात्र दोघांना तो मुंगीच्या पावलांनी चालल्यासारखा भासत होता. मध्यरात्र उलटली. पहाटेचा गार वारा सुटला. अचानक नेताजींनी डोळे उघडले. त्यासरशी बेसावध संताजी एकदम दचकला. नजर अगदी स्वच्छ होती. त्यांनी स्वच्छ पण धिम्या आवाजात हाक मारली–
आफताब…
जी सरकार.
पाणी…
जी सरकार.
तिवईवरील गडव्यातील पाणी आफताबने त्यांच्या मुखात सोडले. दोन-तीन शिंपले भरून पाणी पाजले. थोडे ओठाबाहेर सांडले ते पंचाने टिपून घेतले. संताजीने त्यांच्या कपाळाला हात लावला. हलक्या आवाजात पुसले–
कसं काय वाटतंया सरकार?
काय वेळ झालीय आफताब?
जी. पहाट होत्येय सरकार. नुकतीच पहिल्या कोंबड्यानं बांग दिली.
सरकार उगा जास्त बोलू नगासा. शीन हुईल. निवांत झोपा. आय भवानी समदं गोमटं करील. तुम्हास काय पायजे का सरकार?


आफताब, देव्हाऱ्यात आईच्या पूजेचे तीर्थ असेल तेवढे माझ्या मुखी घाल.
झटकन उठून संताजीने देवासमोरच्या पंचपात्रातले तीर्थ आणून पळीने त्यांच्या ओठाशी नेले.
आफताब…
संताजीने आफताबकडे पाहिले आणि मुकाटपणे पळी-पंचपात्र आफताबच्या हाती सोपविले. त्याने पळीने थेंब थेंब तीर्थ नेताजींच्या मुखात सोडले. पंचपात्र तिथेच उशाशी तिवईवर ठेवले. हलक्या आवाजात बोलला–


सरकार, आराम करा. जास्त बोलू नका.
बोलू दे, बोलू दे. पुन्हा वेळ मिळणार नाही. बोलू दे. पापी औरंग्याने माझ्या अवघ्या कुटुंबाची धूळधाण केली. माझ्या बायका, माझी पोरे ठार केली. माझ्या एका चुकीची सजा बिचाऱ्यांनी प्राणाचे मोल देऊन भोगली. आज माझी घटका भरली. माझ्या शेजारी ना माझी कोणी बायको आहे ना एकदेखील मुलगा. कुणी सगासोयरासुद्धा नाही.


सरकार, बोलू नगासा तरास व्हईल. निवांत व्हा.
आफताब, मी महाराजांच्या कामात कुचराई केली. त्याच पापाचे हे फळ आहे. पोटच्या पोराची मांडी माझ्या नशिबी नाही. त्याच्या हातून मुखी पाणी घेण्याचे नशिबी नाही. आफताब, लेकरा तू मुखी पाणी घातलेस आता तूच माझा लेक. माझे डोके मांडीवर घे. तूच आता माझे सर्वस्व. तूच मला डाग दे.
हुंदका रोखण्यासाठी आफताबने खांद्यावरच्या गमछाचा बोळा तोंडात कोंबला. मोठ्या प्रयासाने संताजीने आपला कंठ रोखला. मात्र त्याचा स्वर भरलेलाच होता.
असं बोलू नगासा सरकार. आई भवानी समदं गोमटं करील. पंतांनी दवा बदलून दिलिया. मनलं, लई गुनकारी हाय. पंधरा-ईस दिसांत चांगलं हिंडाया लागाल.


आफताब, बोलू दे. महाराजांशी भेट झाली नाही. त्यांना माझा सांगावा सांग. माझा सांगावा त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. नाहीतर ओठातला घास ताटात टाकून ते धावत भेटीस येते. आफताब, आता दम धरवत नाही. मीच करंटा. महाराजांच्या एका शब्दावर भल्याभल्यांनी प्राण उधळले. असुदाच्या धारा वाहिल्या. देहाची कुरवंडी केली. पण मी चांडाळ निपजलो. महाराजांची इच्छा पूर्ण नाही करू शकलो. मात्र माझ्यामुळेच त्यांना यातना झाल्या. मनस्ताप सहन करावा लागला. मी करंट्याने त्यांचे सारे मनसुबे नासवून टाकले. त्यांच्या विश्वासाला, प्रेमाला मी पात्र ठरलो नाही. आफताब माझ्यासाठी तू महाराजांची माफी माग. महाराजांना सांग, पुढच्या जन्मी तरी त्यांच्या मनास येईल अशी सेवा हातून घडावी हे मागणे देवाकडे मागतच हा अभागी नेताजी गेला.


*नका नका सरकार, असं वेडंवाकडं काही बोलू नका. व्हाल तुम्ही बरे…*
*असे म्हणत त्याने नेताजींच्या कपाळावर हात ठेवला. त्याने चटकन हात मागे घेतला. अंग थंडगार पडले होते. डोळे थिजून पार गारगोट्या होऊन गेले होते. छातीचा भाता थांबला होता. कपाळावरचा हात दूर होताच मान एका बाजूला कलंडली.*


*पुरंदराच्या बालेकिल्ल्यासारखा अभेद्य, सह्याद्रीच्या बुलंद कड्यासारखा बेलाग, हुताशनीच्या होमासारखा धगधगता, हनुमंतासारखा निष्ठावान इमानी मोहरा काळाच्या प्रवाहात मातीच्या ढेकळासारखा विरघळून गेला. कीर्तीचा मृद्गंध काही काळ दरवळला आणि वातावरणात विरून गेला. मागे उरला गैरसमजुतीचा, अपकीर्तीचा चिखल. धन्याच्या एका शब्दाखातर पतिव्रता सतीसारखे अग्निदिव्य हसत झेलत राहिला, मागे उरली केवळ राख; कोणी तिला भस्म-विभूती म्हणून मस्तकी धरले नाही. सर्वव्यापी बलवान काळाने ती बारावाटा वाऱ्यावर उधळून दिली. एक अग्निदिव्य संपले.*
*--------------------------------------________________*

*जे सदस्य वाचन करत असतील त्यांनी अभिप्राय अवश्य देने आपलाच ......🚩शिवप्रेमी भरत पोळ पाटिल🙏🏻*

Comments

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस