Skip to main content

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

तांड्यावर तिरंगा फडकला

तांड्यावर तिरंगा फडकला ...!!
“विद्येविना मती गेली,मतीविना नीती गेली,नीतीविना गती गेली,गतीविना वित्त गेले,वित्ताविना शुद्र खचले,इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले.” हे महात्मा फुले यांचे सुवचन मानवी जीवनात विद्येचे अनन्यसाधारण महत्त्व विशद करणारे आहे.विद्या नसेल तर माणूस गुलाम बनतो.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी, “गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल” असे म्हटले आहे.मानवी जीवनात विद्येचे महत्त्व या दोन्ही महापुरुषांनी स्पष्ट केले आहे.शिक्षण नसेल तर मानवी प्रगतीत गतिरोध निर्माण होतो.शिक्षणापासून कोसो मैल दूर असलेल्या कर्नाटक सीमेलगत वसलेल्या देवणी तालुक्यातील विळेगावजवळील राम-लक्ष्मण तांड्यावर शिक्षणाची पहाट कशी उजाडली त्याची ही कथा...
       दि.२७ नोव्हेंबर १९९९ हा दिवस राम-लक्ष्मण तांडा विळेगाव येथील रहिवाशांच्या जीवनात सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावा असाच आहे.कारण याच दिवशी या तांड्यावर शिक्षणाची नवी पहाट उजाडली.डी.पी.ई.पी.अंतर्गत पहिल्यांदाच प्राथमिक शाळा सुरु झाली आणि वर्षानुवर्षे अंधारमय जीवन जगणाऱ्या तांडावासीयांच्या आयुष्यात शिक्षणाचा नवीन सूर्योदय झाला...!
     तत्कालीन सरपंच सौ.घमशाबाई गंगाराम चव्हाण यांच्या अथक प्रयत्नामुळे व उदगीर तालुका पंचायत समितीचे तत्कालीन शिक्षण सभापती श्री.विश्वनाथराव बेळकोने मामा यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गटशिक्षणाधिकारी श्री.शिवाजीराव लोंढे यांच्या कारकिर्दीत तांड्यावर प्राथमिक शाळा सुरु झाली.शिक्षक म्हणून अर्थातच गणेश शेषेराव जाधव (सांगवी ता.रेणापूर) व माझी नेमणूक झाली.दोघेही तरुण असल्यामुळे काहीतरी करून दाखविण्याची जिद्द ,धमक आणि सामाजिक बांधिलकीची मनस्वी ओढ यामुळे आम्ही ते आव्हान स्वीकारले.
     पहिल्यांदा मन गांगरून गेले.बंजारा (लमाण) हे अतिशय क्रूर असतात असे बालपणी ऐकलेले त्यामुळे मनात प्रचंड भीती होतीच:परंतु पहिल्याच दिवशी ही भीती कुठल्या कुठे दूर पळाली. तांडावासीयांनी आमचे जोरदार स्वागत केले.त्यांच्या आपुलकीमुळे मनावरील बराचसा ताण निवळला.सुरुवात तर चांगली झाली होती.
     दुस-या दिवशी संपूर्ण तांड्याचे सर्वेक्षण केले.घरोघर भेटी दिल्या.प्रवेशपात्र बालकांची नावे घेतली काही आठ-नऊ वर्षांची होती.गुरे राखायची.त्यांचीही नावे हजेरी पटावर घेतली.एकही मुल शाळाबाह्य राहणार नाही याची काळजी घेतली.  तांड्यावरील १००% मुलांना शाळेत दाखल करून घेतले.२५ ते ३० बालकांना घेऊन शाळा सुरु झाली.चिल्ली-पिल्ली गोळा झाली.या पाखरांची शाळा कडुलिंबाच्या झाडाखाली भरू लागली.ना दप्तर ना पाटी, ना पेन ना वही! मातीवर बोटांचे पेन फिरू लागले.निसर्गात मुक्तपणे बागडणारे चिमणे जीव बिनभिंतीच्या शाळेत जीवनाची धुळाक्षरे गिरवू लागली.अंगावर धड कपडेही नाहीत अशी उघडी-बोडकी बालके शाळेत शिकू लागली.
     पावलोपावली समस्या होत्या.त्यावर मात करायचे ठरले.पहिल्यांदा भाषेचा प्रश्न आमच्या समोर ͑आ΄वासून उभा होता.तांड्यावरील मुलांना मराठी समजत नव्हते अन् आम्हाला बंजारा (गोरमाटी) कळत नव्हते.भाषेच्या आदान-प्रदानाची मोठी पंचाईत झाली.मग ठरवले आधी आपण त्यांची मातृभाषा शिकायची नंतर आपली त्यांना शिकवायची.आमचेही गोरमाटी भाषेचे “ग म भ न” सुरु झाले. विद्यार्थीही शिकू लागले,अन् गुरुजीही...! आमचे काळजीपूर्वक भाषाश्रवण सुरु झाले.गरजेनुसार नोंदी घेऊन भाषांतर करू लागलो.त्यामुळे “ये याडी तार नानके-नानके छोरान् शाळामाही भेज द नी” अशी त्यांची बोलीभाषा फर्राटेदार बोलू लागलो.त्यामुळे आम्ही  त्यांच्यापैकीच एक झालो.मुलांच्या भावविश्वाशी समरस झाल्यामुळे त्यांना आमची भीती वाटेनाशी झाली.आम्ही दिसलो की ती धावतच आमच्याकडे येऊ लागली.”ये चालो रे, मास्तर आवगोच,धासो शाळान्” असं म्हणत मुलं शाळेकडे येऊ लागली.मुलांना गुरुजींचा व गुरुजींना मुलांचा लळा लागला.गुरुजी आपले वाटू लागले.शिकण्यात आवड वाटू लागली.रविवारी व सुट्टीच्या दिवशी मुलांना चुकल्या-चुकल्यासारखे वाटू लागले.रविवारी सुट्टी असते याची पुरेशी जाण नसल्यामुळे सोमवारी शाळेत गेल्यानंतर मुले निरागसपणे विचारू लागली,”मास्तर काल आयो कोन्ती रे तू,सवार आयीची कांय?”मास्तर उद्या येईल की नाही या कल्पनेनेच मुले बेचैन होत.शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील अतूट प्रेमाचे यापेक्षा दुसरे कोणते उदाहरण असू शकेल?
     थोड्याच दिवसात माझ्या सहकाऱ्याची प्रतिनियुक्तीने बदली झाली.त्यामुळे मी एकटाच राहिलो.नवे आव्हान झेलण्याची जिद्द व तांडावासीयांशी जुळलेले स्नेहबंध यामुळे पुढील वाटचाल सुकर झाली.त्यांच्या सामाजिक चालीरीतींचा,शिष्टाचार-सभ्यतेचा अभ्यास करीत स्वतः घडत मुलांना घडवीत राहिलो.तो १५ ऑगस्ट १९९६ चा दिवस होता.भारताला स्वतंत्र होऊन ५० वर्षे झाली होती:परंतु तांडावासीयांच्या जीवनात पहिल्या-वहिल्या ध्वजारोहणाने नव्या स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला होता! त्यांच्या आयुष्यातील अज्ञान, अंधःकार संपल्यामुळे “तिरंगा” निळ्या निरभ्र आकाशाच्या पार्श्वभूमीवर ख-या अर्थाने डोलाने फडकत होता.सरपंचांनी खूप आग्रह केल्यामुळे मी ध्वजारोहणास सपत्नीक हजर होतो.सौ.प्रेमकला पहिल्यांदाच तांड्यावर आल्यामुळे सरपंचताईनी ‘तिरंगा’ फडकवण्याचा आपला मान आमच्या गृहमंत्र्यांना दिला.आमच्या ‘सौ.’लाही पहिल्यांदाच ‘तिरंगा’फडकवण्याचा सन्मान मिळाला....अन् तांड्यावर तिरंगा डौलानं फडकू लागला!! ध्वजारोहणानंतर छोटेखानी भाषणाचा कार्यक्रम झाला. ‘सौ.’ला बोलण्याचा आग्रह झाला.तिनेही मग संधी साधून भाषण ठोकले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षणाचा मंत्रच तांडावासीयांना दिला,‘शिका,संघटीत व्हा,संघर्ष करा.’सायंकाळी ध्वजावतरण केले.घरी परतायला उशीर झाला.पावसाचे दिवस होते.आभाळ झाकाळून आले.जोराचा पाऊस सुरु झाला. आम्ही दोघेही भिजून ओलेचिंब झालो.वरूण राजानेही जणू आमचे अभिनंदन केले होते...असेच शिक्षणाच्या स्वातंत्र्याचा सूर्य पेरीत जा...!!
                             -----डॉ.बालाजी राजाराम समुखराव
                                 संशोधन सहाय्यक ,
                              महाराष्ट्र विद्या प्राधिकरण ,पुणे
                              भ्रमणध्वनी 9284376494

Comments

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस